माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांची समृद्ध आणि आनंदी गाव संकल्पना
गाव हे विकासाचे केंद्र कधी होणार? हा प्रश्न गांधीजींना पडला होता. ७० वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला झाली, पण आपण गाव भकास करत चाललो आहोत. गावातील सर्व आकर्षण नष्ट करून लोकांना शहरात झोपडपट्ट्यांमध्ये रहायला धाडण्यात आले आणि कोरोनाच्या तावडीत अडकवण्यात आले. याचे परिणाम जगभर दिसत आहेत. सर्वात पुढारलेला देश आज सर्वात भयाण अवस्थेत आहे.
भारत स्वतंत्र झाला तेंव्हा ८०% लोक गावात होते. त्यांचा व्यवसाय शेती होता. भारत सुद्धा शेतीला उपयुक्त देश होता. ५२%जमीन शेतीलायक होती. १२ महिने सुर्य होता. वर्षाला ३ पीक घेण्याची क्षमता ह्या देशाची होती. दुसरीकडे अमेरिकेत १९% जमीन शेतीलायक होती. १८% चीन मध्ये होती. साहजिक या आणि इतर विकसित देशांनी उद्योगाला प्रगतीचे सूत्र मानले. जिथे जिथे उद्योग उभे राहिले तिथे तिथे शहरे वाढत गेली आणि जीवनशैली ही शहरी बनत गेली. बहुसंख्य लोक शहरात राहत असल्यामुळे राजकीय आणि आर्थिक धोरणे सुद्धा शहरी बनत गेली. विकासाचे तत्त्वज्ञान सुद्धा शहरी झाले किंवा उद्योगावर आधारित झाले. त्यामुळे शेतीला दुय्यम स्थान मिळाले. भारताचे राज्यकर्ते आणि तत्त्वज्ञानी सुद्धा ऑक्सफर्ड, केंब्रिजमध्ये शिकलेले होते. ज्याप्रमाणे आपण ब्रिटीशांचे कायदे भारतात लागू केले त्याचप्रमाणे आर्थिक विकासाचे तत्वज्ञान सुद्धा इंग्लंडमधील लागू केले. त्यामुळे भारतात शेतीला नगण्य स्थान मिळाले. ग्रामीण भारताची अधोगती होत गेली व देशात आर्थिक विषमता प्रचंड वाढली. शहरातील निवडक लोक प्रचंड श्रीमंत झाले व गावातील लोक गरीब होत गेले. देशात संपत्ती वाढून सुद्धा ती शहरातल्या एका विशिष्ट गटाकडे गेली आणि शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. जर भारताने गांधीजींच्या सांगण्यावरून शेतीला प्रथम स्थान दिले असते आणि उद्योगाला दुय्यम स्थान दिले असते तर भारत जगाचे अन्नाचे भांडार झाले असते आणि आज जगात सर्वात विकसित देश होण्याचा महामार्ग खुला झाला असता. त्यासाठी गाव हे विकासाचे आणि नियोजनाचे केंद्र बनले पाहिजे.
गेली ७० वर्ष नियोजनाचे घोडे गाव सोडून शहराकडे उधळले होते. महाकाय शहरे निर्माण झाली. दाटीवाटीने लोक राहू लागले. तरुण शहराकडे धावू लागले. जगातील खनिज, जंगले, निसर्ग उद्धवस्त करून शहरी जीवन आणखी सुखमय, विलासी बनवण्यात माणुसकी जळून गेली. म्हणून वेळ आली आहे की प्राप्त परिस्थिती बदलण्यासाठी, आनंदी जीवनाचे खरे रहस्य उलगडण्यासाठी एक नवीन दिशा घेऊन मानवी जीवन सुखी आणि समृद्ध केले पाहिजे.
जीवनाची संकल्पना आनंद आणि समृध्दी आहे. गावांचा सामुदायिक विकास करण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान, किर्लोस या संस्थेने पुढाकार घेतलेला आहे. समृद्ध गाव हाच उद्देश नजरेसमोर ठेवून आम्ही स्थानिक आमदार, लोक प्रतिनिधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुंबई मंडळ, कृषि अधिकारी, शिक्षक, आरोग्य सेविका, बचत गट महिला प्रतिनिधी, गावातील सक्रीय लोक यांच्या उपस्थितीत गावांमध्ये अनेक बैठका घेतल्या. बैठकांमध्ये गावामध्ये आनंदी आणि समृद्ध समाज कसा बनवता येईल यावर चर्चा करून एक विकास आराखडा बनवला आहे. चर्चेअंती गावातील वरील सर्व घटकांना एकत्रित करून एक गाव विकास कमिटी स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. समृद्ध गाव ही संकल्पना यशस्वी व्हायची असेल तर गावातील लोकांचा प्रभावी सहभाग अपेक्षित आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान ही संस्था गावामध्ये वेळोवेळी येऊन शेती उत्पादन, फळ प्रक्रिया, बाजारपेठ अशाप्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांचे सहाय्य घेऊन प्रशिक्षण व मार्गदर्शन करत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान ही संस्था समृद्ध गाव योजनेत एक दुवा म्हणून काम करत आहे. याचबरोबर गावची ग्रामपंचायत, स्थानीक गाव समिती, मुंबई मंडळ, लोक प्रतिंनिधी यांनी समृद्ध गावाचा आराखडा कार्यान्वित करण्यासाठी शासन, कंपन्या , सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून निधी उभारण्याच्या कामात सहभाग घेणे अपेक्षित आहे.
समृद्ध गाव प्रकल्पाचे उद्दिष्ट गावातील प्रत्येक व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून देणे व प्रत्येकाला स्वावलंबी करणे हे आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तु गावातच बनवण्याची व्यवस्था बनत आहे. त्यायोगे गावातील पैसा गावातच ठेवणे आवश्यक आहे. बाहेरचा पैसा गावात आला पाहिजे. म्हणून गावातील तयार माल बाहेर विक्रीला गेला पाहिजे. नैसर्गिक शेती पद्धतीच्या माध्यमातून शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे. रासायनिक खते आणि किटकनाशक गावातून तडीपार केली पाहिजेत. त्याचबरोबर गावातील पिकांच्या स्थानिक जातींचे संवर्धन करून, औषधी वनस्पतींचे देखील उत्पादन केले पाहिजे. त्यातून गावातील प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे. गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करून गावातील पिण्याचे व सिंचनाचे पाणी उपलब्ध करून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे.
तसेच योग व क्रीडा यांच्या सोयी सुविधा निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक स्त्रीने व्यायाम केलाच पाहिजे. सकाळी महिलांनी एकत्र येऊन योगा करावा किंवा खेळ खेळावा. स्त्रियांनी हे करणे म्हणजे ग्रामीण जीवनात आश्चर्य वाटण्यासारखे आहे. पण सुरुवातीला कुठलीही नवीन आणि चांगली प्रथा हास्याचा विषय होतो. पण त्याला न जुमानता आपल्यासाठी आपणच बदल केला पाहिजे.
दुसरीकडे ग्रामीण जीवनातील आनंदच नष्ट झाला आहे. त्याला समृद्ध करण्यासाठी सांस्कृतिक चळवळीतून जीवन आनंदी करता येते. सणवार तर आहेतच पण ग्रामीण लोकांचे लक्ष कला-कौशल्याकडे वळविले पाहिजे. उदा. प्रत्येकाने एक तरी वाद्य वाजविले पाहिजे किंवा गायन केले पाहिजे, नाचले पाहिजे. त्यातून आनंद मिळाला पाहिजे. विकास म्हणजे नुसते काम नसते. आनंद आला पाहिजे नाहीतर जीवन रुक्ष होते, प्रभोधनाशिवाय दु:खी माणूस विकसित होत नाही. उत्पन्न संस्कृतीतून मानवाला आध्यात्मिक बळ मिळते. ते जोपासण्याची गरज आहे.
गोसंवर्धन चळवळ व पशुसंवर्धन हे ग्रामीण जीवनाचा महत्वाचा भाग आहे. उत्पादन आणि उत्पन्नाचे साधन आहे. बचत गटाद्वारे गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी पालन, मत्स्यपालन करणे सहज शक्य आहे. प्रत्येक गाव हे Wi-Fi युक्त पाहिजे, म्हणजे गावातील लोकांना जगाचे ज्ञान मिळविण्यासाठी काही अडचण येणार नाही. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वेगवेगळी साधने उपलब्ध करता येतील. गाव प्रगती पथावर नेण्यासाठी स्थानिक नेतृत्व निर्माण होईल. त्यासाठी इंटरनेटद्वारे जगाशी संवाद साधता येईल व मार्गदर्शन घेता येईल. गावातील शेतमालावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण घेता येईल व त्या आधारावर उद्योग सुद्धा उभारता येतील. कृषि माल व बचतगटांना बाजारपेठ उपलब्ध होईल. हे सर्वच तेव्हाच साध्य होईल, जेव्हा गावामध्ये विकासाची दिशा एकसंघपणे ठरेल. घाणेरड्या राजकारणाचा शिरकाव गावात होऊ देऊ नका. राजकीय पटलावर स्पर्धा होणारच पण तिचा परिणाम गावाच्या विकासावर कधीही होता कामा नये.